माढा लोकसभा – मतदारसंघाच्या उमेदवारीवरून ‘आमचं ठरलंय..’ असं म्हणत मोहिते पाटलांनी पुन्हा जुन्या – नव्या दोस्तांचा दोस्ताना वाढविला आहे. मोहिते पाटलांच्या भूमिकेमुळे माढा मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच चुरस निर्माण केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघांमध्ये मोहिते पाटील समर्थकांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचे फोटो लावून ‘आमचं ठरलंय.. खासदारचं अशा पोस्ट सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केल्या आहेत. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे व मोहिते – पाटलांचे सख्य जगजाहीरच आहे.
लोकसभा निवडणुकीत आता कोणत्याही प्रकारे माघारी नाही असेच मोहिते पाटील समर्थक बोलत आहेत. यातच मोहिते पाटलांनी विविध तालुक्यांमधून आपल्या जुन्या व नव्या दोस्तांचा दोस्ताना सध्या वाढवलेला दिसून येत आहे. माढयाची लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळते यावरच मोहिते पाटलांचे समीकरण अवलंबून असणार आहे. भाजपने उमेदवारी डावलली तर मोहिते पाटील ‘आमचं ठरलंय. असे म्हणतील का ?
यावरच मतदारसंघाचे व विरोधी उमेदवाराचे चित्र स्पष्ट होणार आहे. मोहिते पाटील – विशेषतः धैर्यशील मोहिते पाटील हे मतदारसंघातील आपल्या समर्थकांबरोबरच नव्याने जोडलेल्या मित्रांबरोबर वेगवेगळ्या प्रकारे बैठका व चर्चा करण्यावर भर देत आहेत. निमित्त हे चहापानाचे व इतर कोणतेही असले तरी हे सर्व ‘आमचं ठरलं..’ यासाठीच तर त्यांनी दोस्ताना वाढविला तर नाही ना ? असाच प्रश्न सध्या तरी उपस्थितीत होत आहे. सध्याच्या शिंदे फडणवीस पवार’ त्रिकूट – सरकारच्या नव्या राजकीय समीकरणामुळे या मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकरांनाच ताकद मिळणार आहे.
निवडणुका जाहीर नसताना नाईक निंबाळकर व मोहिते पाटलांच्या संबंधामुळे मतदारसंघातील शिंदे बंधू अगोदरच खासदार नाईक निंबाळकर यांना मोठ्या मतांचे लीड देणार असल्याचे बोलत आहेत. आमचं ठरलं या मोहिते पाटील समर्थकांच्या पोस्टवर खासदार नाईक निंबाळकर ‘नो कमेंट्स’ एवढेच बोलत आहेत तर मोहिते पाटील समर्थक ‘आमचं ठरलय..’ म्हणत असले तरी नेमकं काय ठरलंय हे मात्र मोहिते पाटीलही उघडपणे बोलत नाहीत.
यामुळे दोघांकडूनही ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ अशीच अवस्था सध्या तरी दिसून येत आहे. आगामी निवडणुकी संदर्भात उमेदवारीबद्दल मोहिते पाटील काहीच बोलत नसल्याचे दिसून येत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील स्वतः आपल्या समर्थकांच्या कार्यक्रमासाठी, पक्षाच्या कामांसाठी व चहापानासाठीही त्यांनी भेटीगाठी वाढवल्या आहेत. नेत्यांबरोबर सध्या मोहिते पाटील समर्थकही आमचं ठरलंय.. याशिवाय काहीच बोलत नाहीत. शांततेत कार्यक्रम मात्र निश्चित होणार एवढे मात्र हसून बोलत आहेत.