डोंगरगावच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा बाबर यांची निवड

डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा तानाजी बाबर यांची निवड झाली आहे. डोंगरगावच्या शेतकरी कामगार पक्षाच्या माजी सरपंच उषा रविकांत पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदाची सोम दि २३ रोजी निवडणुक पार पडली. दरम्यान सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सौ. सुरेखा बाबर यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सोमवार दि २३ रोजी ग्रामपंचायत डोंगरगाव येथे झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुरेखा तानाजी बाबर यांना ६ मते मिळाली तर विरोधी द्रौपदी सचिन फोंडे यांना केवळ ३ मते मिळाल्याने सुरेखा तानाजी बाबर यांना विजयी घोषित करण्यात आले. गेल्या अडीच वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष अशी आघाडी झाली होती. या आघाडीला ९ पैकी ६ जागांवर निर्विवाद विजय मिळाला होता. आघाडीतून शेतकरी कामगार पक्षाच्या उषा रविकांत पवार यांना प्रथम अडीच वर्षे सरपंचपदाचा बहुमान मिळाला होता. मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सध्या डोंगरगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले होते.

या पदासाठी आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा तानाजी बाबर यांनी तर विरोधात द्रौपदी सचिन फोंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत सुरेखा तानाजी बाबर यांना ६ तर द्रौपदी सचिन फोंडे यांना ३ मते मिळाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी उल्हास पोलके यांनी सुरेखा तानाजी बाबर यांना विजयी घोषित केले. सरपंच पदावर सुरेखा तानाजी बाबर यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला.

नूतन सरपंच सुरेखा तानाजी बाबर यांचा माजी सरपंच उषा रविकांत पवार यांनी सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी दर्शवलेला विश्वास आणि सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत सदस्यांनी आपल्यावर विश्वास दर्शवून गावाची सेवा करण्याची संधी दिली आहे. आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावू आणि दिपकआबांच्या माध्यमातून गावासाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करून गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असेही यावेळी नूतन सरपंच सुरेखा तानाजी बाबर यांनी सांगितले.