इस्लामपूर शहरातील सर्व कॅफेंची कडक तपासणी करून बेकायदशीर कॅफेंवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी इस्लामपूर शहर युवक राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिग्विजय पाटील, सरचिटणीस अभिजित रासकर, उपाध्यक्ष अभिजित कुर्लेकर यांनी निवेदन दिले.
सांगली शहरात कॅफेच्या नावाखाली राजरोसपणे गैरप्रकार सुरू होते.
इस्लामपूर शहरातही मोठ्या प्रमाणात कॅफेंची संख्या आहे. शहरातील सर्व कॅफेंनी कायदेशीर परवाने घेतले आहेत का? आणि त्याप्रमाणे कॅफे चालविले जात आहेत का? याची पोलिस खात्याने तपासणी करून अवैधरीत्या कंपार्टमेंट असलेल्या कॅफेवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. कॅफे परिसरात दामिनी आणि निर्भया पथकांची गस्त सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, रोझा किणीकर, युवती राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा दीपाली साधू, प्रियांका साळुंखे, अभिमन्यू क्षीरसागर, प्रतिभा पाटील, सुप्रिया पेठकर, मालन वाकळे, सुनंदा साठे, सुनंदा पेठकर, साधना ताटे, गीता पाटील आदींसह विविध महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.