पुढील 500 वर्ष विठुराया आणि रुक्मिणी मातेला मेघडंबरीचा विसावा!

पंढरपूरमधील विठुरायाच्या मंदिराला 700 वर्षापूर्वीचे रूप देण्याचं काम सध्या सुरु असताना आता देवाच्या दगडी गाभाऱ्यात नवीन मेघडंबरीमध्ये देव पुढील शेकडो वर्षांसाठी विसावणार आहे. मंदिर गाभाऱ्याचं काम करताना देवाच्या शेजारी बसवलेली पुरातन मेघडंबरी कुजून गेल्याचं समोर आलं होतं. यानंतर पुन्हा नव्यानं मेघडंबरी बनविण्याचा विषय आल्यावर वारकरी फडकरी संघाचे उपाध्यक्ष विष्णू महाराज कबीर यांनी ही मेघडंबरी देण्याचा संकल्प सोडला. यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं यासाठी लागणारे जुने सागवानी लाकूड आणून त्यात पूर्वीच्याच आकाराची मेघडंबरी बनविण्यास सुरुवात केली. 

गेले दीड महिना अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारण्यास सुरुवात केली. विठुरायाची मूर्ती मोठी असल्यानं त्याची उंची 9 फूट तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीची उंची कमी असल्यानं येथे 7 फूट उंचीची मेघडंबरी बनवून तयार झाली आहे. यावर अतिशय रेखीव असं नक्षीकाम करण्यात आलं असून यासाठी वापरलेले सागवानी लाकूड हे पाच फूट रुंदीचा बुंधा असणाऱ्या झाडापासून घेण्यात आलं आहे. हे लाकूड सर्व सिझनमध्ये राहिलेलं असल्यानं या सागवानी लाकडाचं आयुष्य किमान 500 वर्ष असल्याचा दावा मिलिंद कारंडे यांनी केला आहे. विठ्ठल मंदिरात पूर्वी ज्या पद्धतीनं ही मेघडंबरी होती, त्याच आकारात ही नवी मेघडंबरी बनविण्यात आली आहे. पहिली मेघडंबरी काढताना विष्णू महाराज कबीर यांनी देवापुढे नवीन मेघडंबरी देण्याचा संकल्प सोडला होता. यासाठी साधारण 60 घनफूट एवढं सागवानी लाकडाचा वापर करण्यात आला आहे. 

सध्या विठुरायाच्या मूळ रूपात आलेल्या दगडी गाभाऱ्यात केवळ विठूरायाची मूर्ती पाहायला मिळत आहे. आता देवाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीखालील दगडी सिहासनावर ही नव्यानं बनवलेली मेघडंबरी उभी केली जाणार असून यावर मंदिर समितीकडून चांदीचं काम केलं जाणार असल्याचं मंदिर समितीचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं. पूर्वीच्या मेघडंबरील चांदीही 20 गेज जाडीची होती. मात्र त्याला वारंवार हात लागून तिची झीज झपाट्यानं होत होती. कालांतरानं अनेक ठिकाणी ही बसवलेली चांदी फाटल्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळे आता या मेघडंबरीवर 16 गेज जाडीच्या चांदीच्या पत्र्याचं आवरण केलं जाणार असून त्यामुळे मेघडंबरीवरील चांदीही पुढील वर्षानुवर्ष व्यवस्थित राहील, असा दावा कार्यकारी अधिकारी शेळके यांनी केला आहे. 

आता लाकडी मेघडंबरीचं काम पूर्ण झाल्यानं त्याच्यावर पॉलिशिंग, इतर आयुष्य वाढवणारे लेप दिल्यावर चांदी बसवण्याच्या कामास सुरुवात होणार आहे. देवाचं चरणस्पर्श दर्शन जरी 2 जूनला सुरु होणार असलं तरी आषाढी सोहळ्यापूर्वी गाभाऱ्यात मेघडंबरी बसविण्याचं काम पूर्ण होईल, असं शेळके यांनी सांगितलं आहे.