नाशिकमध्ये पुन्हा एकदा हत्येची भयंकर घटना घडली आहे. नाशिकरो़डच्या जेलरोड भागात दोघांवर प्राणघातक हल्ला (Attack) करण्यात आला. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे. रितेश डोईफोडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. जुन्या भांडणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर आरोपी स्वत: नाशिकरोड पोलिसात आल्याची माहिती आहे. नाशकात वारंवार गुन्ह्याच्या घटना घडत असल्याने नाशिककरांना धास्ती भरली आहे.
नाशिकरोड येथील जेलरोड भागातील मोरे मळा, बालाजी नगर येथे धारदार शस्त्राने एकाचा खून केल्याची घटना गुरुवारी (१ मे रोजी) रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. जेलरोड मोरमळा भागात अवैध दारू विक्रीच्या व्यवसायातून ही हत्या झाल्याची परिसरात चर्चा आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकच्या जेलरोड मोरे मळा येथील राहणारा निलेश पखळे याचा अवैध दारू विक्रीचा धंदा होता. जेलरोड महाजन हॉस्पिटल मागे राहणारा रेकॉर्ड वरील सराईत आरोपी हितेश डोईफोडे हा नेहमी निलेश पेखळे याच्याकडे पैशांची मागणी करत राहायचा. गुरुवारी रात्री रितेश हा निलेश पेखळे यांच्या मोरेमळा येथील घरी आला आणि त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागला. तसेच, त्याने निलेश पेखळे याला पैशांसाठीही दमदाटी केली.
या दोघांमधला वाद इतका विकोपाला गेला की निलेश पेखळे याने शस्त्राने हितेश याच्या डोक्यावर, खांद्यावर आणि पाठीवर जोरदार वार केले. तसेच, यावेळी हितेशसोबत असलेल्या त्याच्या मित्रावरही हल्ला केला. यामध्ये हितेश गंभीर जखमी झाला. त्यातच रक्तबंबाळ झालेल्या हितेशचा मृत्यू झाला. तर, त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या बिटको रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हितेश याचा जागेवरच मृत्यू झाल्यातं पाहून निलेश पेखळे हा स्वतः नाशिकरोड पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.