जून महिन्यापासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम!

मे महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहे. मे महिन्यानंतर आता जून महिना लागणार आहे. नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून अनेक नियम बदलणार आहेत. या बदलांकडे लक्ष न दिल्यास तुमच्या खिशाला कात्री लागू शकते. येत्या 1 जूनपासून घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात बदल होणार आहे. यासह वाहतुकीच्या नियमातही अनेक बदल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर बदललेले हे नियम काय आहेत? यासह अन्य कोणकोणत्या नियमांत बदल झाला आहे, हे जाणून घेऊ या.

गॅस सिलिंडरच्या दरात होणार बदल 

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिडंरच्या दरात बदल होत असतो. या दिवशी देशातील ऑईल मार्केटिंग कंपन्या या गॅस सिलिंडरच्या किमती ठरवत असतात. बदललेला हा दर प्रत्येक महिन्याच्या एका तारखेपासून लागू होतो. त्यामुळे येत्या एक जूनपासून गॅस सिलिंडरच्या दरात बदल होणार आहे. याआधी 9 मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी झाले होते. व्यावसायिक गॅसदेखील एप्रिल महिन्यात स्वस्त झाला होता. त्यामुळे जून महिन्यात गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार की वाढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आधारमध्ये बदल करण्यासाठीच्या मुदतीत वाढ  

यूआयडीएआयच्या एका निर्णयामुळे सामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे. कारण यूआयडीएआयने आधारमध्ये मोफत बदल करण्याची मुदत 14  केली आहे. म्हणजेच आता 14 जूनपर्यंत सामान्य लोकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता आधार कार्डमध्ये बदल करता येईल. आधार सेंटरवर जाऊन आधार कार्डमध्ये बदल करायचा असल्यास प्रत्येक अपडेटसाठी 50 रुपये द्यावे लागतील.

…तर भरावा लागणार 25 हजारांचा दंड

येत्या जून महिन्यात वाहतुकीच्या अनेक नियमांत बदल करण्यात येणार आहे. कोणताही अल्पवयीन मुलगा गाडी चालवताना दिसल्यास त्याच्या पालकांकडून मोठा दंड आकारला जाणार आहे. हा दंड 25 हजार रुपयांपर्यंत असू शकतो. विशेष म्हणजे 25 वर्षांपर्यंत लायसन्स देण्यात येणार नाही. 

वाहतुकीच्या नियमात आणखी मोठे बदल

येत्या 1 जूनपासून वाहतुकीच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. कोणत्याही व्यक्तीने या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्याकडून मोठा दंड आकारला जाऊ शकतो. वेगाची मर्यादा ओलांडत एखाद्या व्यक्तीने गाडी चावल्यास 2000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. हा दंड अगोदर एक हजार रुपये होता. लायसन्स नसताना गाडी चालवल्यास 500 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. हेल्मेट नसताना किंवा सिट बेल्ट नसताना गाडी चालवल्यास संबंधित व्यक्तीला 100 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.