सध्या ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आहे. बऱ्याच गोष्टी ऑनलाईन ऑर्डर केल्या जातात आणि त्याची होम डिलीव्हरी होतं. म्हणजे अगदी या वस्तू घरपोच मिळतात. आपल्या दारात येतात. पण कधी तुम्ही ऑर्डर न करताही तुमच्या घरी अशी पार्सल डिलीव्हरी आली आहे का? असंच घडलं ते एका महिलेसोबत. ऑर्डर न करता तिच्या घरी एक-दोन नव्हे तर तब्बल 100 बॉक्स पार्सल आले. तिने बॉक्स उघडून पाहिले आणि तिला धक्काच बसला.
व्हर्जिनयातील हे प्रकरण आहे. इथं राहणारी सिंडी स्मिथ नावाची ही महिला. तिच्या घरी ई-कॉमर्स कंपनीकडून पार्सल आलं. एक-दोन नव्हे तर तब्बल 100 बॉक्स होते. एकाच दिवसात इतक्या बॉक्सची डिलीव्हरी तिच्या घरी आली होती. आश्चर्य म्हणजे तिनेने काहीच ऑनलाईन ऑर्डर केलं नव्हतं. त्यामुळे इतके पार्सल पाहून तिलाही धक्का बसला.
स्मिथ म्हणाली, हे पॅकेजेस अॅमेझॉन, फेडएक्स आणि इतर कंपन्यांकडून आले आहेत. मी एकही ऑर्डर दिली नव्हती. डिलीव्हरी करण्यात आलेल्या पॅकेजवरील पत्ता माझा आहे. पण नाव लिक्सियाओ झांग असं आहे. दर दहा मिनिटांनी हे पार्सल येत होते. काही पॅकेजेस शेजाऱ्यांच्यांही घरी पोहोचले.
स्मिथने या बॉक्समध्ये नेमकं आहे काय, हे पाहण्यासाठी म्हणून ते उघडले. त्यात जे सापडलं ते पाहून तिला धक्काच बसला. स्मिथने सांगितलं, या बॉक्समध्ये 1000 पेक्षा जास्त धावण्यासाठी आणि बाईक चालवण्यात वापरले जाणारे हेडलॅम्प, 800 ग्लू गन आणि मुलांच्या खेळण्यातील डझनभर दुर्बिणी होत्या.
आता इतक्या वस्तूंचं करायचं काय? असा प्रश्न तिच्यासमोर होता. त्यापैकी काही वस्तू तिने आपल्या शेजाऱ्यांना दिल्या. काही ती आपल्या गाडीत घेऊन फिरते आणि जो कुणी भेटतो, त्याला देते, असं ती म्हणाली.