लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी

शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी अलीकडे केलेल्या काही वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. या वादामुळे शिंदे गट आणि भाजपचे नेते एकमेकांना भिडले होते. त्यामुळे भविष्यात या वादाचा वणवा पुन्हा भडकण्यापूर्वीच शिंदे गटाकडून गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल, अशी चर्चा आहे.

मात्र, या कारवाईचा नेमका मुहूर्त कधी, हे निश्चित झाले नव्हते. परंतु, नव्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निकालापूर्वीच शिंदे गटाकडून गजानन कीर्तिकर यांच्याबाबत फैसला होऊ शकतो. कीर्तिकर यांच्यावरील कारवाईचा निर्णय २-३ दिवसांत होईल, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली. त्यामुळे आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गजानन कीर्तिकर यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर पक्षातून हकालपट्टी करण्याची कठोर कारवाई करणार की त्यांना काही काळासाठी निलंबित करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.