पावसाळ्यात डासांपासून अशी करून घ्या सुटका…….

पावसाळ्यात डासांची समस्या खूप वाढते. कारण या दिवसांमध्ये पाणी ठिकठिकाणी साचल्यामुळे डासांची समस्या वाढते. म्हणून या दिवसात डेंग्यू किंवा मलेरियासारख्या आजारांचा धोका जास्त वाढतो.अशात डास घरात येऊ नये किंवा आलेले डास बाहेर काढण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. जर हे उपाय तुम्ही रोज केले तर गंभीर आजारांचा धोका टाळला जाऊ शकतो.

कापराचा धूर

कापराचा वापर तुम्ही कीटक किंवा डास पळवण्यासाठी करू शकता. यासाठी तुम्ही २ ते ३ कापराच्या वड्या जाळून रूममध्ये ठेवा. यानंतर रूम थोडावेळ बंद ठेवा. जेव्हा कापूर पूर्णपणे जळेल तेव्हा रूमचा दरवाजा उघडा. कापराच्या सुगंधाने डास तुमच्या रूममधून बाहेर पडतील.

कडूलिंबाच्या पानांचा धूर

कडूलिंब हा एक चांगला आयुर्वेदिक उपाय मानला जातो. जर तुमच्या घरात डासांनी हल्ला केला असेल तर तुम्ही कडूलिंबाच्या हिरव्या पानांचा धूर करू शकता. ही पाने जळू नये त्यांना थोडं पेटवून धूर करा. त्यातून केवळ धूर निघावा. बघता बघता घरातील सगळे डास काही वेळात बाहेर पडतील.

लसणाच्या पेस्टचा वापर

लसणाचा सुगंध जरा उग्र असतो. हा सुगंध डासांना सहन होत नाही. सामान्यपणे जिथे लसूण ठेवलेलं असतं तिथे डास येत नाहीत. जर तुमच्या घरात जास्त डास झाले असतील तर लसणाची पेस्ट तयार करा. रूममधील काही कोपऱ्यात ती ठेवा. डास लगेच पळतील.

पुदीन्याचा रस फायदेशीर

तसा तर पुदीन्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यासोबतच पुदीन्याचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठीही केला जातो. याच पुदीन्याचं रोप तुम्ही घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवू शकता.