लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपून आता निकालासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची झाल्यामुळे निकाल काय लागणार, याबाबत सध्या सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही मनात धाकधूक आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात अवघ्या चार-पाच महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वी भाजपला (BJP) मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरेआता भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये येत्या 26 जूनला निवडणूक होत आहे. यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातून राज ठाकरे यांना आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघातून सध्या भाजपचे निरंजन डावखरे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपला असला तरी भाजपकडून त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते. मात्र, मनसेनेही कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवार उतरवल्याने भाजपची गोची झाली आहे. राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांना उमेदवारी देणे, हा भाजपसाठी मोठा झटका मानला जात आहे.