वर्षानुवर्षे दुष्काळाने होरपळलेल्या भागाचा कायापालट करण्यासाठी टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय खानापूर येथे सुरू केले. खानापूर येथे गुहागर विजापूर महामार्गालगत कोट्यवधी रुपये किंमत असणाऱ्या प्रशस्त अशा जागेमध्ये टेंभूच्या दैनंदिन कामकाजासाठी कोट्यवधी रुपये खर्चून इमारती बांधल्या आहेत. या परिसरामध्ये दोन मोठे गोडाऊन व चार इमारती आहेत. तर एका इमारतीचे बांधकाम पायाभरून अपूर्ण सोडले आहे.
सात फुटांपर्यंत बांधलेल्या इमारतीच्या भिंती आता ढासळू लागल्या आहेत.गोडाऊनचे पत्रे व काचा फुटल्या आहेत. इतर इमारतींचे दरवाजे मोडले असून खिडक्यांच्या काचा पूर्णपणे फुटलेल्या आहेत. कुंपणाच्या तारा तुटल्या असल्यामुळे प्रवेशद्वार फक्त नावालाच उरले असून मद्यपी व प्रेमीयुगुलांचा या परिसरामधील इमारतीमध्ये मुक्तपणे वावर सुरू असतो.
एका इमारतीमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. मुख्य इमारतीमध्ये टेबल, खुर्च्या व कागदपत्रे खोलीभर अस्ता व्यस्त पसरली आहेत. दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या टेंभू योजनेच्या खानापूर हे कार्यालय परिसरातील मद्यपी व प्रेमीयुगुलांचा अड्डा बनले आहे.