Navra Mazha Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला……..

मराठी चित्रपटप्रेमींचा अत्यंत आवडता चित्रपट ‘नवरा माझा नवसाचा’ २००५मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ आणि सुप्रिया पिळगावकर या दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

आजही या चित्रपटातील संवाद, गाणी आणि विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात कोरलेले आहेत. सचिन पिळगावकर यांनी जेव्हा ‘नवरा माझा नवसाचा २’ची घोषणा केली, तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये अभिनेता स्वप्नील जोशी महत्त्वाची भूमिका साकारणार असून, त्याच्यासोबत आणखी एक स्टार कलाकारदेखील असणार आहे.

नुकतेच स्वप्नील जोशीने या चित्रपटासाठी डबिंग पूर्ण केले आहे.त्यामुळे हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे सरकले आहे. स्वप्नील जोशीसह अभिनेता सिद्धार्थ जाधव ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

अलीकडेच सिद्धार्थने सोशल मीडियावर डबिंग पूर्ण झाल्याची बातमी शेअर केली. त्याने ‘नवरा माझा नवसाचा २’चे पोस्टर आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत.

या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि अली असगर यांसारखे प्रमुख कलाकार दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री हेमल इंगळेने सोशल मीडियावर तिचे डबिंग पूर्ण झाल्याचे जाहीर केले होते. जेव्हा या सिनेमाचे शूटिंग रत्नागिरीमध्ये सुरू होते, तेव्हा काही व्हिडीओही व्हायरल झाले होते. हा चित्रपट २०२४च्या अखेरीस प्रदर्शित होण्याचा अंदाज आहे.