एसटीसह ४ वाहने एकमेकांवर आदळून तिघे जखमी…..

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कामेरी (ता. वाळवा) गावच्या हद्दीत झालेल्या विचित्र अपघातात ४ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास झाला.अपघातातील चारही वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत इचलकरंजी एसटी आगारातील चालक संदीप दत्तात्रय भोई यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी कंटेनरवरील अनोळखी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या अपघातात चिन्मय प्रशांत ठाकूर, वैष्णवी रामचंद्र खवणेवाडी, प्रणवराज वसंतराव आपटे हे जखमी झाले.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संदीप भोई हे (एमएच ०६, बीडब्ल्यू- ११३४) ही एसटी बस घेऊन कोल्हापूरकडे निघाले होते. कामेरी गावच्या हद्दीत अनोळखी चालकाने कंटेनर (क्रमांक नाही) आडवा मारल्याने भोई यांनी बसचा वेग एकदम कमी केल्याने पाठीमागून आलेली एसटी बसची क्रमांक (एमएच १४, बीटी ४०४५) पाठीमागून धडक बसली.

याच बसच्या पाठोपाठ असलेल्या बस क्रमांक (एमएच १४, बीटी ४२२३) ही समोरील बसवर पाठीमागून आदळली. तर या बसच्या पाठीमागून आलेली मोटार (एमएच ४३, बीजी २५९०) ही पुढील बसवर आदळून मोटारीचे नुकसान झाले. अपघातातील तीन वाहनांच्या समोरील काचा आणि डॅशबोर्डचे नुकसान झाले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.