राहुल गांधी बनले मुलाखतकार; पुलवामा बद्दल मोठे गौप्यस्फोट

पुलवामा हल्ला आणि पीएम मोदी यांच्यावर गंभीर आरोप करणारे जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांनी या संभाषणात पुन्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

काही दिवसांपूर्वी सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारलाच जबाबदार धरले होते. तसेच भ्रष्टाचाराबाबत देखील थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेक गंभीर आरोप केले, यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

तुम्ही जम्मू-काश्मीरमध्ये तुम्ही होतात तेव्हा काय स्थिती होती? असा प्रश्न राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिकांना विचारला. यावर मलिक म्हणाले की, तो कठीण काळ होता, माझं म्हणणं आहे की, जम्मू कश्मीरला बळजबरीने किंवा लष्कराच्या वापराने व्यवस्थित ठेवू शकत नाहीत. तिथल्या लोकांची मने जिंकून तुम्ही काहीही करू शकतात. तेथील लोक प्रेमळ असल्याचं मला जाणवलं. मी त्यांना माझ्या सोबत करून घेतलं होतं.

काश्मीरचा प्रश्न कसा सुटेल?

या राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर देताना मलिक म्हणाले की, पहिल्यांदा तर त्यांना राज्याचा दर्जा परत दिला पाहिजे. त्यांना ३७० इतकं वाईट वाटलं नाही, जितकं राज्याचा दर्जा काढून घेत केंद्रशासित प्रदेश केल्याचं वाईट वाटलं. केंद्रशासित प्रदेश का बनवलं ते मला माहिती नाही पण मला वाटतं की, यांना वाटत होतं की पोलिस बंड करतील, पण तसं काही नव्हतं जम्मू काश्मीरचे पोलिस भारत सरकारशी एकनिष्ठ राहीले. पण आता राज्याचा दर्जा परत देऊन त्यानंतर तेथे निवडणूका घ्यायाला पाहिजेत असे सत्यपाल मलिक म्हणाले.

पुलवामा हल्ल्यानंतर काय झालं?

पुलवामा हल्ल्याबद्दल काय मत आहे? या प्रश्नावर बोलताना मलिकांनी सांगितलं की, पुलवामा यांनी केलं असं तर नाही म्हणाणार, पण पुलवामामध्ये झालेल्या घटनेकडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि यांनीत्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला. यांची तशी भाषणे आहेत असेही सत्यपाल मलिक म्हणाले.

ज्या दिवशी हे झालं तेव्हा हे नॅशनल कॉर्बेट पार्कमध्ये शूटींग करवून घेत होते. मी तीन चार वेळा प्रयत्न केले पण संपर्क झाला नाही. पाच-सहा वाजता फोन आला तेव्हा मी सांगितलं की आपले इतके लोकं शहीद झाले आहेत आणि आपल्या चुकीमुळे झालं आहे. तेव्हा मला सांगितलं की, गप्प राहा, यावर काही बोलू नका. एक तासानंतर डोव्हाल यांचा फोन आला आणि त्यांनीही यावर काही बोलू नका असं सांगितलं.

मला वाटलं की याची चौकशी होईल आणि त्यावर परिणाम होईल म्हणून बोलू देत नसतील, पण तिसऱ्या दिवशी मृत्यूंचं राजकारण करण्यात आलं. आतापर्यंत या प्रकरणात काहीच झालं नाही.

पुलवामामध्ये जवानांचा मृत्यू झाला कारण यांनी विमाने दिली नाहीत. त्यांनी पाच एअरक्राफ्ट मागितले होते. जर मला मागीतले असते तर लगेच दिले असते. चार महिने अॅप्लिकेशन मंत्रालयात पडून होतं आणि त्यानंतर अमान्य करण्यात आलं. यावेळी अटॅक होऊ शकतो अशी शक्यता होती, असेही सत्यपाल मलिक यावेळी म्हणाले.

आता ईडी-सीबीआय मागे लागणर

तुम्ही मोठ्या हिमतीने पुलवामाबद्दल शेतकऱ्यांबद्दल भाष्य केलं. त्यानंतर तुम्हाला धमकवण्यात आलं सीबीआय चौकशी झाली याबद्दल राहुल गांधी यांनी प्रश्न विचारल्यानंतर मलिक म्हणाले की, तुम्हाला अश्चार्य वाटेल की, कायदा जो तक्रार करतो त्याला शिक्षा देत नाही, मी तक्रार केली त्यांना अद्याप साधे प्रश्न देखील विचारण्यात आले नाहीत. माझ्याकडे हे तीनदा आले, स्टाफमधील लोकांचे फोन सीबीआयवाले घेऊन गेले. मी त्यांना सांगितलं की मी फकिर माणूस आहे तुम्ही माझं काही करू शकत नाहीत, तर ते जाताना आम्ही फक्त आमची नोकरी करतोय असं सांगत असेही मलिक यावेळी म्हणाले.

मुलाखतीच्या शेवटी आता आपण बोलतोय तर यानंतर पुन्हा तुमच्यावर आक्रमण केलं जाईल असं राहुल गांधी म्हणताच मलिकांनी करू देत, माझ्यावर तर सारखंच करतात. मला काही फरक पडत नाही असं रोखठोक उत्तर दिलं.