बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही नेहमीच तिच्या परखड वक्तव्यासाठी ओळखली गेली आहे. विषय कोणताही असो त्यावर कंगना बोलण्यास तयार असते. आपण जे बोलतो त्यावर ठाम राहून आक्रमकपणे भूमिका व्यक्त करणारी सेलिब्रेटी म्हणून ती आता पुढे आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षानं साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात अनेकांनी पॅलेस्टाईनला आपला पाठींबा दर्शवला आहे. भारतातील बहुसंख्य लोकांनी पॅलेस्टाईमध्ये मुस्लिम बांधवांवर जो अन्याय, अत्याचार सुरु आहे त्यावरुन इस्त्राईलवर टीका केली आहे. येत्या काळात हे युद्ध तातडीनं थांबण्याची गरज आहे. अशी मागणी अनेक देशांकडून केली जात आहे.
अशातच बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी इस्त्राईल अन् पॅलेस्टाईनवरील युद्धावर दिलेल्या प्रतिक्रियांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. एकीकडे हॉलीवूडमधील ५० हून अधिक अभिनेत्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहून हे युद्ध थांबवावे अशी विनंती केली होती.
या सगळ्यात अभिनेत्री कंगना रनौतनं इस्त्राईलचे भारतातील राजदूत नाओर गिलोन यांची भेट घेतली आहे. दिल्लीतील इस्त्राईल दुतावासात जाऊन तिनं त्यांची भेट घेत ट्विटरवर पोस्ट केली आहे. याशिवाय इस्लामिक आतंकवादाच्या विरोधात इस्त्राईलच्या बाजूनं आपले समर्थन दिले आहे.
यापूर्वी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करनं देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर मात्र जेवढ्या प्रमाणात या युद्धावर सेलिब्रेटींच्या प्रतिक्रिया येणे अपेक्षित होते तसे झालेले नाही.त्यामुळे चाहत्यांनी देखील सेलिब्रेटींच्या या गप्प बसण्याच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे.
कंगनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास तिचा तेजस नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. याशिवाय तिचा भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित इमर्जन्सी नावाचा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.