महिलांचा वाढता टक्का कोणाला धक्का उलटसुलट चर्चेला उधाण….

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया काल पार पडली. हुपरी पंचक्रोशीतील गावांमध्ये विधानसभेत कोण आमदार जाणार याचा फैसला मतदान पेटीत बंदिस्त झाला. प्रचंड टोकाची इर्षा घरादारापर्यंत आलेले राजकारण व जातीय समीकरणे मांडूनच लोकप्रतिनिधींची झालेली झुंज लक्षणीय ठरणार असून लाडक्या बहिणींच्या निर्णायक मतांमुळे आश्चर्यकारक निकाल लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हुपरी पंचक्रोशीतील गावांमध्ये सरासरी ८० टक्के मतदान झाले आहे.

दरम्यान पट्टणकोडोली येथे २७० क्रमांक मतदान केंद्रांवर जाऊन १०५ वयाच्या आजीने मतदानाचा हक्क बजावला. शिरमाबाई आप्पासो नावलगी असे त्यांचे नाव असून एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. अनेक वयोवृद्ध महिला व व्यक्तींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामागे प्रशासनाची जागरूकता महत्त्वाची आहे. महिलांचा वाढता टक्का कोणाला धक्का याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले असून महायुती आणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमचाच उमेदवार कशी बाजी मारणार याचे गणित मांडत आहेत. तर परिवर्तन आघाडीचा उमेदवार दमदार एन्ट्री करणार याचे भाकीत शेतकरी संघटनेचे नेते करत आहेत. यामुळे २३ नोव्हेंबरला काय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

हुपरीतील २४ मतदान केंद्रावर ७२:७९ टक्के, रेंदाळमधील ४ केंद्रावर ७७ टक्के, पट्टणकोडोलीतील १५ केंद्रावर ७५ टक्के, तळंदगेतील १ केंद्रावर ७९: ६९ टक्के, यळगूड १ केंद्रावर ७७ : ३८टक्के, इंगळीतील ५ केंद्रावर ८1:४० टक्के मतदान झाले. निवडणूक विभागाचे शेकडो अधिकारी, कर्मचारी तसेच ३ पोलिस अधिकारी, पोलिस शिपाई ७३ होमगार्ड यांनी सेवा बजावली. पीआय गजानन सरगर यांच्या अधिपत्याखाली एकंदरीत ही निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून कसलाही अनुचित प्रकार घडला नाही.