काल विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. सांगली जिल्हयातील खानापूर विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदारसंघात ६९.६६ टक्के मतदान झाले. देवीखिंडी, भाळवणीसह काही गावात उशीरपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहिली. गेल्या दोन दिवसात झालेल्या पडद्याआडच्या घडामोडीमुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार याबाबत मात्र गावागावातून चर्चा सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या निधनामुळे सुरवातीला सोपी वाटणारी निवडणूक रंगतदार करण्यात विरोधकांना चांगले यश आले आहे. खानापूर मतदारसंघात महायुतीकडून सुहास बाबर तर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील रिंगणात उतरले. तसेच आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत या लढतीचे चित्रच बदलून टाकले.
महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांना भाजप, राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच कॉंग्रेस, उध्दव ठाकरे यांची शिवसेना असा म्हणजेच सर्वपक्षीय पाठिंबा मिळाल्यामुळे प्रत्यक्षात निवडणूकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
सकाळपासून खानापूर मतदारसंघातील विटा शहारासह खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कल मधील गावागावात मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळच्या पहिल्याच टप्प्यात जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न राहिला. त्यानुसार सकाळी ११ पर्यंत १६ टक्के तर दुपारी बारा वाजेपर्यंत ३१ टक्के मतदान झाले. सायंकाळी ७ वाजता सुमारे ६९.६६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी दिली. खानापूरात प्रत्येक गावात बाबर आणि पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न केला.
सर्वाधिक चुरस दिसून आली ती विटा शहारात. आगामी काही महिन्यातच विटा नगरपालिकेची निवडणुक होणार असल्याने विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही गटानी आपली प्रतिष्ठापणाला लावल्याचे दिसून आले. सांयकाळी उशीरापर्यंत काही गावात मतदान प्रक्रिया सुरू होती.
मतदानप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खानापूर मतदारसंघात निकालाची उत्सुकता आणखी वाढली आहे. विटा शहरातून बाबर आणि पाटील यापैकी कोण लीड घेणार, खानापूर तालुका आणि विसापूर सर्कल मधील जनतेने कोणाला साथ दिली. तसेच माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख हे आटपाटी तालुक्यातून किती मते घेणार या सर्व बाबींची आकडेमोड करूनच निकालाचा कौल सांगता येणार आहे. सद्या मात्र सुहास बाबर आणि वैभव पाटील यांच्यात चुरस तर राजेंद्र देशमुख यांना आटपाडी तालुक्यातून आघाडी मिळणार एवढें चित्र स्पष्ट झाले आहे. खानापूर मतदारसंघाचा नुतन आमदार कोण हे मात्र प्रत्यक्षात निकालातूनच स्पष्ट होणार, हे निश्चित.