गेल्या दोन दिवसांपासून सांगली शहरात पावसाची हजेरी लागत आहे. मंगळवारीही दुपारनंतर दमदार पाऊस झाला होता. बुधवारी दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. मध्यम स्वरूपाच्या पावसाने बुधवारी सांगली शहरामध्ये हजेरी लावली. दुपारपासुनच ढग दाटुन आले होते. सुमारे तीन तास पावसाने हजेरी लावल्याने शहराच्या विविध भागांत पाणी साचून राहिले. ड्रेनेजची खोदाई केलेल्या भागात दलदल निर्माण झाली होती.
परिणामी वाहनधारकांची चांगलीच दमछाक झाली.
थोड्याशा पावसातही शहरातील प्रमुख बाजारपेठा, रस्ते अन् चौकांमध्ये पाणी साचून राहत असल्याचे चित्र दिसत आहे.
बुधवारीही सांगलीच्या विश्रामबाग ते कुपवाड रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील स्टेशन रोड, मारुती रोड, शिवाजी मंडई परिसरात पाणी साचून राहत आहे. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.
