अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!

भाजप आणि शिंदे गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आल्यानंतर आज 23 ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर केली.इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून पहिल्या यादीमध्ये अजित पवार यांच्याकडून जयंतरावांच्या विरोधात उमेदवार जाहीर केला जाईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, पहिल्या यादीमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात मोहरा अजूनही अजित पवारांनी निश्चित केलेला नाही.

या मतदारसंघांमध्ये भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्यांना रिंगणात उतरवले जाईल अशी चर्चा आहे. या निर्णयानंतर शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. गौरव नायकवडी आणि आनंदराव सुद्धा शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.अजित पवार यांनी सांगलीमधून तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून सुद्धा उमेदवार देण्याची रणनीती आखली आहे.

यामुळे जयंत पाटील यांच्यासह रोहित पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे चेहरा कोणता असणार याची चर्चा आहे. पहिल्या यादीत दोन्ही मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी उमेदवार जाहीर केलेला नाही. दरम्यान, निशिकांत पाटील यांनी प्रयत्न सुरु केल्यानंतर शिंदे गटाने सुद्धा प्रयत्न सुरु केले आहेत.