कोणत्याही वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मी (राज ठाकरे) एकत्र आलो आहे. आम्हाला एकत्र आणायचं बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही कुणालाच जमलं नाही. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जमलं, असं मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतची एक आठवणही राज ठाकरेंनी सांगितली. दरम्यान, राज ठाकरेंचं भाषण संपताच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत हात मिळवला आणि त्यांची पाठही थोपटली. ठाकरे बंधूंचा यादरम्यानचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
आजचा मेळाव्याला घोषणा हीच आहे कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पहायचं नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तुमच्याकडे विधानभवनात सत्ता आहे आणि आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. अमित शाह म्हणतात ज्याला इंग्रजी येत त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणवून. पण तुम्हाला येतं कुठे? आम्ही मराठी भाषा कधी लादली का? हिंदी फक्त २०० वर्ष पूर्वीची आहे. यांनी आत्ता चाचपडून पहिलं. यांना काय मज्जाक वाटली का सक्ती करायला?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचं ठरलं आहे. मला बाळासाहेबांनी सांगितलं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल. असे संस्कार झालेला व्यक्ती मराठीसाठी तडजोड करेल का?, असा सवाल उपस्थित करत मराठीसाठीची एकजूट कायम राहणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.