सोमवारी संपूर्ण देशात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. भाई-बहिणीचे प्रमे अधोरेखित करणाऱ्या या सणाची बहीण-भाऊ मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतात. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. भाऊ परगावी असेल तर अनेक बहिणी पोस्टाद्वारे आपल्या भावाला राखी पाठवतात. या सणाचे महत्त्व लक्षात घेता या दिवशी बँकांना सुट्टी असेल का? असे विचारले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर खरंच बँकांना सुट्टी असेल का? हे जाणून घेऊया. तुम्हाला बँकेशी संबंधित महत्त्वाचे काम करायचे असेल, तर सोमवारी बँक चालू राहील का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. दरम्यान, रक्षाबंधनच्या या दिवशी अनेक राज्यांत बँकांना सुट्टी असेल. तर काही ठिकाणी बँका चालू राहतील.सोमवारी रक्षाबंधन हा सण आहे. यासह सोमवारी पौर्णिमादेखील आहे. याच दिवशी बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यांचा जन्मदिवसही आहे.
याच कारणामुळे अगरतळा, अहमदाबाद, भूवनेश्वर, देहरादून, जयपूर, कानपूर, लखनौ आणि शिमला या ठिकाणी बँका बंद असतील. तर देशात उर्वरित ठिकाणी बँका चालू राहतील. रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील बँका चालू राहणार आहेत. रक्षाबंधनच्या दिवशी महाराष्ट्रातील बँकांना सुट्टी नसेल. त्यामुळे तुमचे बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर तुम्ही ते करू शकता.