महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असून अनेक भागात पावसाने हजेरी देखील लावली. मान्सून दाखल होत असताना पहिल्याच टप्प्यात दुष्काळी टापूत दमदार पावसाने हजेरी लावल्याने ओढे नाले प्रवाही झाले आहेत. आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये अद्याप टेंभू योजनेचे पाणी पोहोचले नाही.
या भागातच पाऊस पडल्याने शेतकरी आनंदात आहेत.
आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील खरसुंडी, झरे, घाणंद, घरनिकी, पडळकरवाडी, जांभुळणी, निंबवडे, वाक्षेवाडी या परिसरात शनिवारी जोरदार पाऊस पडला.
अनेक वर्षांनंतर या भागातील ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले. शनिवारी सकाळपासून आटपाडी तालुक्यामध्ये पावसाचे ढग दाटून आले होते. दुपारी तीननंतर तालुक्याच्या बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावली. झरेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यातून तब्बल वीस वर्षांनंतर पाणी वाहिले. या पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. दुपारनंतर दिघंचीत दमदार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. पावसामुळे करपून चाललेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे.