आटपाडी नगरपंचायत प्रारूप विकास आराखड्यात अनेक चुका होऊन नागरिकांवर अन्याय झाल्याने माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची भेट घेऊन हा आराखडा बदलण्यासाठी राज्य शासनाकडे मागणी करावी ,अशी विनंती केली आहे. आटपाडी नगरपंचायत क्षेत्रात प्रारूप विकास आराखड्याच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने आरक्षणे टाकण्यात आली आहेत. हा विकास आराखडा अन्यायकारक असून तो रद्द करावा ,अशी मागणी तटकरे यांच्याकडे राजेंद्रअण्णा देशमुख यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख उपस्थित होते.
लोकनियुक्त बॉडी नगरपंचायतीमध्ये अस्तित्वात आल्यानंतर लोकसभागृहातून आराखडा तयार झाला पाहिजे . अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून सर्व आराखडे बनविले आहेत. त्यामुळे हा अन्यायकारक विकास आराखडा रद्द करावा ,अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी हा प्रश्न अजित पवार यांच्याकडे मांडून विकास आराखडा रद्द करावा ,अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.
