आटपाडी तालुक्यात चारा डेपो सुरू करण्याची मागणी!

सध्या सगळीकडे पाऊस कमी झाल्याने शेतकरी हा हवालदिल झाल्याचे दिसतच आहे. तसेच आटपाडी तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न खूपच गंभीर बनत चाललेला आहे.

तसेच अनेक भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपली जनावरे कशी वाचवावी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे. शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून आटपाडी तालुका जाहीर केलेला आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीवर कोणत्याही उपाय योजना शासनाने जाहीर केलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्गातून खूपच नाराजीचा सूर दिसत आहे.

निवडणुकीच्या कामांमध्ये प्रशासन व्यवस्था व्यस्त असल्याने दुष्काळी भागांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अनेक शेतकरी चारा अभावी अनेक जनावरे विकण्याच्या तयारीत आहेत. सध्या पाणी आणि चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुधन वाचवणे खूपच अवघड झालेले आहे. त्यामुळे पशुधनासाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.