सांगली लोकसभेच्या निवडणूक निकालाने विद्यमान आमदार, माजी आमदार व प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला. दुष्काळी पट्ट्यातील तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, जत व मिरज पूर्व भागातील नेत्यांशिवाय केवळ कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विशाल यांनी एक लाखाचे मताधिक्य घेतले.नेत्याशिवाय आपण अपक्ष उमेदवार निवडून आणू शकतो, हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना गवसला.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे. खानापूर-आटपाडी विधानसभेचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे शिंदे गटाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याकडे आहे. तसेच, माजी आमदार ॲड. सदाशिव पाटील गटाचे नेतृत्व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्याकडे आहे. मात्र, हे दोन्ही नेते महायुतीसोबत आहेत.
तसेच, आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हेही महायुतीसोबत आहेत. मात्र, आपले नेते एकत्र असल्याचे कार्यकर्त्यांना रुचले नाही. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा तिसऱ्या गटाचा येथे उदय झाला आहे. या गटात बाबर व पाटील दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत. या तिसऱ्या गटाने खानापूर-आटपाडी विधानसभेतून विशाल पाटील यांना १६ हजार ६५४ मताधिक्य दिले आहे.