हुपरी शहाराच्या सौंदर्यात भर घालणारा नियोजित सूर्य तलाव सुशोभीकरण रखडले आहे. जिल्हा नियोजन फंडातून मिळालेल्या ८० लाख रुपये निधीची केवळ एक महिना मुदत राहिली आहे. यातच कंत्राटदारांने कामाला सुरुवात करण्यासाठी हालचाल करीत असताना मटेरियल परत घेऊन जायची पाळी आली आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप कारणीभूत ठरला असून याला टक्केवारीची किनार असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हुपरी शहरातील स्थानिक विरुद्ध बाहेरचा कंत्राटदार असा छुपा संघर्ष सुरू झाला असून तडजोडीच्या बुलेट ट्रेनला हिरवा कंदील मिळाला नसल्याने काम बंद पाडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या तलावाचे सुशोभीकरण झाले तर हुपरी शहराचे वैभव वाढेल जेष्ठ नागरिकांना विरंगुळा
तर लहान मुले महिलांना चार पावलांचा फेरफटका मारायला उत्तम सोय होईल याबाबत कोणीही विचार करायला तयार
नाही. शहराच्या विकासाला गती देण्याऐवजी वैयक्तिक स्वार्थापोटी लोकप्रतिनिधींचे आडमुठे धोरण शहराला घातक ठरले आहे. जाणूनबुजून विकास कामांना खीळ घातली जात आहे. हे दुर्दैवी आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत आता पुढे येऊन जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा ८० लाखांचा निधी परत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.