विनय कोरे, आवाडे यड्रावकर यांच्या मंत्रीपदाची चर्चा…….

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना पुन्हा खासदार बनवण्यात मोलाचा वाटा उचललेले आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

मंत्रिमंडळाच्या १५ जागा रिक्त असून २७ जूनला सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. त्यामध्ये यातील किमान एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदेसेनेकडून राजेंद्र पाटील यड्रावकर हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

परंतु भाजपचा एकही आमदार नसल्याने मंत्रिपद द्यायचेच झाल्यास सहयोगी पक्षाचे विनय कोरे किंवा प्रकाश आवाडे यांना संधी दिली जाणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आवाडे यांना मंत्रिपद देण्यापेक्षा त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांचे समाधान केले जाऊ शकते. कोरे मात्र मंत्रिपद मिळणार असले तरी तीन महिन्यांसाठी ते हे पद स्वीकारतील का याबाबतही शंका व्यक्त होत आहे.