घरात उकडतंय म्हणून तरुण अंगणात झोपला; मध्यरात्री जे घडलं ते पाहून..

घरात उकडतंय म्हणून २२ वर्षीय तरुण अंगात झोपला. पण मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्यावर अचानक बिबट्याने हल्ला चढवला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही दुर्देवी घटना संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. 

सचिन भानुदास कुरकुटे (वय २२ वर्ष) असं मृत तरुणाचं नाव आहे. सचिनच्या मृत्युने परिसरातून हळहळ व्यक्त आहे. मात्र, त्याच्या मृत्यूबाबत मिळालेल्या माहितीवरुन वनाधिकारी व पोलिसांनी व्यक्त केलेल्या मतामुळे, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथे रुग्णवाहिका चालक असलेले भानुदास कुरकुटे त्यांची पत्नी संगीता व मुले सचिन व हरिश यांच्यासह कुरकुटवाडी येथे राहतात. गुरुवारी रात्री त्यांची पत्नी घरात तर मुले नेहमीप्रमाणे घराच्या पडवीत झोपली होती.

रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सचिनचा भाऊ हरीश याला जाग आली. त्याने सचिनवर बिबट्या हल्ला करत असल्याचं बघितलं. आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने पळ काढला, असं हरीशने सांगितलं. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सचिनला ग्रामस्थांनी उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नातेवाईकांनी सचिनचा मृतदेह आळे येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. ही बाब वनविभाग व घारगाव पोलिसांना शुक्रवारी सकाळी समजली. पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.