शासनामार्फत अनेक विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांचा पुरेपूर फायदा देखील शेतकऱ्यांना होतो. सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करायची आणि ती कृषिपंपांना उपलब्ध करून द्यायची, अशी राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्प योजना राज्यभर राबवली आहे. या योजनेतून आटपाडी तालुक्यात लिंगीवरे, माडगुळे, करगणी, घाणंद, झरे, खरसुंडी व पळसखेल अशा सात ठिकाणी गायरान जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देणारे आटपाडी तालुक्यातील सात पैकी चार सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पातून ४२ मेगावॉट वीज तयार होणार आहे.लवकरच शेतकऱ्यांसाठी वीज उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पातून तयार होणारी वीज त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी दिवसा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे शेतीसाठी अपुऱ्या वीज पुरवठ्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
शेतीला रात्री पाणी देण्याच्या समस्येतून सुटका होणार आहे.आटपाडी तालुक्यातील सात पैकी लिंगीवरे, माडगुळे, करगणी आणि घाणंद येथील वीज प्रकल्पांसाठी जागा अधिग्रहित करून प्रत्यक्षात सौर पॅनेल उभे करण्याचे काम गतीने सुरू आहे. चारही ठिकाणचे काम मार्चअखेर पूर्ण होऊन एप्रिल ते मेपासून वीज उपलब्ध होणार आहे. लिंगीवरे येथे ७.७६ आणि ६.६९ हेक्टर क्षेत्रावर सात व आठ मेगावॉटचे दोन वीज प्रकल्पांचे काम सुरू आहे. माडगूळ येथे २५ एकरावर पाच एम.व्ही., करगणी येथे शंभर एकरवर २० एम. व्ही. आणि घाणंद येथे ७५ एकरावर सात एम. व्ही.चे काम सुरू आहे.
अन्यत्र पळसखेल, झरे आणि खरसुंडी येथील कामाला अद्याप सुरवात झाली नाही.चार ठिकाणचे वीज प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तयार होणारी वीज त्या गावातील उपकेंद्रांना जोडली जाणार आहे. या उपकेंद्रांतून ही वीज शेतकऱ्यांना दिवसा दिली जाणार आहे. त्यामुळे २० हजारांवर शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. आठवड्यातील चार दिवस रात्री पिकाला पाणी देण्याच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. प्रकल्प पूर्ण होऊन कधी कार्यान्वित होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.आटपाडी तालुक्यात सात प्रकल्पापैकी चार ठिकाणची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. लवकरच या प्रकल्पातून तयार होणारी वीज शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा उपलब्ध होणार आहे.
