उरूण परिसरातून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतून आलेल्या गटारी सांगली रस्त्याच्या बाजूने वाळवा फाट्यापर्यंत जातात. यातील अर्धेच काम झाल्याने गटारी तुंबल्या आहेत. त्यातच आता मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्यानंतर गटारीचे पाणी काहींच्या घरात आणि शेतात पसरते तसेच सांगली रस्त्यावरही पाणी येते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
इस्लामपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते वाळवा फाट्यापर्यंत गटारीचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबल्याने काहींच्या घरात आणि शेतात शिरले आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पालिका प्रशासनाने वेळोवेळी नालेसफाई केली असती तर ऐन पावसाळ्यात परिसरातील नागरिकांवरील संकट टळले असते. या दुर्गंधी पाण्याच्या त्रासावरून येथील नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
येथील गटारीची साफसफाई वेळेत केली जात नाही. पालिकेतील आरोग्य खातेही कोमात आहे. तक्रार केल्यानंतरच गटारीचा उपसा केला जातो. अन्यथा आठ-आठ दिवस सफाई कामगार फिरकत सुद्धा नाहीत. पालिकेवर प्रशासक असल्याने लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करतात. ऐन पावसाळ्यामध्ये परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गटारीच्या पाण्याचा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.