आपल्या शेतीला (Farming) काय पूरक आहे आणि काय मारक आहे ? याचा आपण शेतकऱ्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा. आपण आता शेती करण्याचा पध्दतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. सध्या इतक्या झपाट्याने शेती क्षारपड होत आहे, मग पुढच्या पिढीला तुम्ही ही क्षारपड जमिनच देणार आहात काय ? असा सवाल राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे यांनी केला.
बहे (ता. वाळवा) येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या समृध्द भूमी अभियान अंतर्गत जमीन सुधारणा कार्यक्रमात ते बोलत होते. शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, , जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, माजी संचालक माणिक पाटील, अॅड. कृष्णराव पाटील, कृष्णेचे संचालक अविनाश खरात, दूध संघाचे संचालक अनिल खरात, सोसायटीचे अध्यक्ष डांगबाबा शिंदे, जयदीप पाटील, ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील, सहाय्यक विवेक पुजारी, जलसिंचन अधिकारी जे. बी. पाटील, गटाधिकारी संग्राम पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते.
अमरसिंह साळुंखे म्हणाले, सध्या शेतीची उत्पादकता कमी होऊन उत्पन्न घटत आहे. मात्र शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता शेती करताना आपणास शेतीतील उत्पादन वाढविताना खर्च कमी कसा होईल याचा विचार करायला हवा. त्यासाठी माती परिक्षणापासून सेंद्रीय खतांच्या वापरापर्यंत, तसेच पाणी आणि रासायनिक खतांच्या संतुलित वापराबद्दल गांभीर्याने विचार करायला हवा. याचवेळी जमिनीची सुपिकता आणि माणसाचे आरोग्यही जपायला हवे.
विठ्ठल पाटील म्हणाले, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील हे शेतकऱ्यांना अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. यावेळी ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील, जल सिंचन अधिकारी जे. बी. पाटील, विवेक पुजारी यांनी प्रतिक पाटील यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या राजारामबापू सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रारंभी माजी सरपंच बी. जी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी आभार मानले.
याप्रसंगी सिताराम हुबाले, विलासराव पाटील, माजी अध्यक्ष जालिंदर पाटील, जालिंदर देशमुख, आविष्कार नांगरे, आर. आर. बडवे, कुंडलिक खरात, दिनकर पाटील, सयाजी पाटील, प्रविण पाटील, कालिदास पाटील, बाळासाहेब वाठारकर, अमर थोरात, धनाजी पाटील, हणमंत नावाडकर, पोपटराव पाटील, जयवंत पाटील, अविनाश पाटील, समीर जमादार, रोहित तोरस्कर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.