कोजागिरी पूजा, चंद्रग्रहण! लक्ष्मीपूजन केव्हा आणि कसे करावे?

णेशोत्सव, नवरात्री, दसऱ्यानंतर कोजागरी पौर्णिमा शनिवारी (ता. २८) साजरी केली जाणार आहे. कोजागरी पौर्णिमा ही शरद पौर्णिमा म्हणून ही ओळखली जाते. यंदा खंडग्रास चंद्रग्रहण असल्याने रात्री आठनंतर लक्ष्मी इंद्राचे नामस्मरण करून चंद्राला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा.

दुसऱ्या दिवशी दुधाचे सेवन करणे फायदेशीर ठरणार आहे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा अर्थात कोजागरी पौर्णिमेला शनिवारी रात्री एक वाजून पाच मिनीट ते दोन वाजून तेवीस मिनीट इतका ग्रहणाचा काळ आहे. 

रात्री आठनंतर पूजन करणे लाभदायी

कोजागरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीचीही पूजा केली जाते. यंदा लक्ष्मी पूजनासाठी दिवसा आणि रात्री दोन शुभमुहूर्त आहेत. सर्वात चांगला मुहूर्त ८.५२ ते १०.२९ हा आहे. अमृत-सर्वोत्तम मुहूर्त १०.२९ ते १२.०५ असा आहे.

या मुहूर्तांपैकी कोणत्याही वेळी लक्ष्मी पूजन करता येणार आहे. वेधकाळात रात्रीच्या वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध-साखरेचा नैवेद्य दाखविता येईल. मात्र चंद्राची छाया पडल्यानंतर दुधाचे पूर्ण सेवन न करता पळीभर प्रसाद म्हणून ग्रहण करून दुसऱ्या दिवशी दूध प्राशन करणे फायदेशीर ठरणार आहे.

वृश्चिक, मिथुन, कर्क, कुंभ राशींना शुभ फळ

खंडग्रास चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. ग्रहण तिसऱ्या प्रवाहात असल्याने दुपारी तीनपासून सशक्त व्यक्तींनी ग्रहण संपेपर्यंत वेध पाळावेत. रात्री आठनंतर जप, ध्यान करावे. गुरुमंत्र घेतला असल्यास पवित्र मंत्राचे पठन करावे. हवन करून गायीला नैवेद्य दाखवावा.

ग्रहण संपल्यानंतर स्नान करावे. ग्रहण काळात वृश्चिक, मिथुन, कर्क, कुंभ राशींना शुभ फळ मिळत आहे. सिंह, तूळ, धनू, मीन राशींना मिश्र फळ मिळतील. मेष, वृषभ, कन्या, मकर राशीच्या लोकांना अनिष्ट फळ आहे. बालक, वृद्ध, गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाळू नये. ग्रहण काळात चालत आलेल्या रुढी-परंपरांचे पालन करावे. असे आवाहन पुरोहितांनी केले आहे.

दृष्टीक्षेपात

– दुपारी तीनपासून वेध पाळावेत

– पारायण, भगवद्गीतेचे पठन करावे

– विष्णू सहस्रनाम, वृद्राभिषेक पठन करावे

– हवन करून देवी- देवतांचे नामस्मरण करावे

– ग्रहण संपल्यानंतर स्नान करणे

“कोजागरी पौर्णिमेला खंडग्रास ग्रहण असल्याने दुपारी तीननंतर सशक्त व्यक्तींनी वेध पाळणे गरजेचे आहे. रात्री एक एक वाजून पाच मिनीट ते दोन वाजून तेवीस मिनीट इतका ग्रहणाचा काळ आहे. रात्री आठनंतर लक्ष्मी-इंद्राचे नामस्मरण करून दूध-साखरेचा नैवद्याचे पळीभर सेवन करून दुसऱ्या दिवशी घेणे फायदेशीर ठरणार आहे.”