ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बेपर्वाईची मालिका अद्याप कायम आहे. येथे उपचारांसाठी आलेल्या एका मुलीच्या जांघेत इंजेक्शन देत असताना इंजेक्शनची सुई जांघेतच तुटली. या प्रकाराला १६ दिवस होऊनही या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास डॉक्टरांना वेळ नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सुई आतमध्ये राहिली होती, याची कबुली रुग्णालयाच्या वतीनेही देण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी निष्काळजीमुळे एका रात्रीत १८ मृत्यू झाले होते. या या प्रकरणामुळे कळवा रुग्णालय प्रशासनाची हलगर्जी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
कळवा रुग्णालयातील मृत्यूंच्या मालिकेमुळे सर्वच स्तरातून रुग्णालय प्रशासनावर टीका झाली होती. याप्रश्नी चौकशी समिती नेमण्यात आली होती. मात्र समितीच्या अहवालावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. त्यातच रुग्णालय प्रशासनाची हलगर्जी नवीन प्रकरणामुळे समोर आली आहे. एक महिन्यांपूर्वी ही १६ वर्षीय मुलगी उपचार घेण्यासाठी रुग्णालयात आली होती. यावेळी तिला इंजेक्शन देताना सुई जांघेतच तुटली. मात्र १६ दिवस उलटूनही याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही, असे ‘एक्स’वर ट्वीट करून आमदार आव्हाड यांनी हा प्रकार उघडकीस आणला.
रुग्णालय प्रशासनाची कबुली
या मुलीला न्यूमोनिया झाला होता. खूप गंभीर परिस्थितीत तिला आणण्यात आले होते. सलाइन लावण्यासाठी नस मिळत नसल्याने सेंट्रल लाइन गाइड वापर करून पायाच्या नसांमधून इंजेक्शन देण्यात येत होते. यावेळी तिच्या शरीरात ती गाइड वायर राहिली आहे, असे रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कळवा रुग्णालयाकडे इंटरविनायल रेडिओलॉजिस्ट आणि कर्डिअॅक सर्जन नसल्याने तिला पुढील उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र अशा पद्धतीने रुग्णाच्या जीवाचे काही बरेवाईट झाले, तर त्या मुलीचा पाय कापावा लागेल. इतकी बेपर्वाई डॉक्टर कसे काय करू शकतात, इंजेक्शन देत असताना सुई तुटतेच कशी? असे प्रश्न आव्हाड यांनी यांनी ट्वीटच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.