सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मन सुन्न करणारी घटना घडली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केला. खून केल्यानंतर रात्रीच भीमा नदीकाठी पत्नी मृतदेहाला जाळून टाकले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे ही मन सुन्न करणारी घटना सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या भावाविरोधात खून आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
भाग्यश्री बसवराज कोळी (वय २७) असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. मंद्रूप पोलिसांनी पती बसवराज अडव्याप्पा कोळी याच्या विरुध्द खूनाचा तर त्याचा भाऊ गजानन आडव्याप्पा कोळी आणि शिवानंद आडव्याप्पा कोळी सर्व राहणार तेलगाव (ता. दक्षिण सोलापूर) यांच्याविरुद्ध गुपचूप मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला आहे.
बसवराज कोळी याचे लोणी (ता. इंडी जि विजयपूर,रा.कर्नाटक) येथील मामा गोविंद शिरप्पा कोळी यांची मुलगी भाग्यश्री हिच्याशी २०१४ मध्ये लग्न झाले होते. कोळी दाम्पत्यास आदित्य व अमृता ही दोन अपत्ये झाली. तेलगावच्या बसवराज कोळी यांनी काही वर्षांपूर्वी निंबर्गी येथे शेती घेतली होती. सर्व कुटुंब या शेतात राहण्यास होते. तेलगाव येथे बसवराज कोळी हा मोटरसायकल दुरुस्तीचे काम करून शेतात परत जात होता.
पती घरी नसताना पत्नी सतत फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याने पतीला संशय येऊ लागला. तेव्हा पाळत ठेवून पती बसवराजने याचा छडा लावला. निंबर्गी येथील एका तरुणाशी पत्नी भाग्यश्रीचे अनैतिक संबंध होते. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरू होता. अखेर रागाच्या भरात पतीने पत्नी सोमवारी पहाटे भाग्यश्रीला दगड घालून झोपेतच ठार केले. पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्यानंतर बसवराज शांत बसून राहिला. त्याचा भाऊ शिवानंद कोळी यांनी मेव्हणा चंद्रकांत कोळी याला फोन करून बसूने तुझी बहीण भाग्यश्रीचा खून केल्याचे सांगितले. तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते.
चंद्रकांत याने आम्ही आल्याशिवाय अंत्यविधी करू नका असे सांगितले. मात्र बसवराज आणि त्याचे दोन्ही भाऊ यांनी नदीकाठी रात्रीच लाकडे टाकली. अंथरुणासह मृतदेह उचलून नदीकाठी घेऊन गेले. तेथे लाकडावर ठेवून पेटवून दिले. दिवस उगवताना नदीकाठी गेलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह जळताना पाहिला. तेलगाव गावात एकच चर्चा सुरू झाली. लोणीहून आलेल्या नातेवाईकांनी घरी व मृतदेह जळालेले ठिकाण पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.