शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी (Marriage) तातडीने ५० हजार रुपये अल्प व्याजात देण्याचे धोरण जिल्हा बॅंकेने घेतलेले आहे.त्यांची तातडीने अंमलबजावणी करीत आहे. त्यासाठीची तरतूद बॅंकेच्या नफ्यातून केली जात आहे. सांगली जिल्ह्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना आम्ही पीक कर्जेही तोटा सहन करून देत आहोत, असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.
जिल्हा बॅंकेवर काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा बॅंकेवर काढलेला मोर्चा केवळ राजकीय हेतूने काढला आहे. बॅंकेच्या कारभारावर सभासद, शेतकरी, ठेवीदार कामगार खूष आहेत. जिल्हा बॅंकेची मोर्चेकऱ्यांना एसटी कर्मचारी बॅंक करायची आहे का असा प्रश्न आमदार नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.ते पुढे म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ पाटील यांनी एसटी कामगारांचे आंदोलन केले.
त्यांचे कायदेशीर सल्लागार ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सहकार्याने त्यांनी एसटी कर्मचारी बॅंकेवर पॅनेल उभा करून निवडून आणले. बॅंकेचा अनुभव नसल्याने चुकीच्या धोरणामुळे एसटी बॅंकेतील ७० टक्के ठेवी कमी झाल्या. बॅंक अडचणीत आली. कर्मचाऱ्यांचे पगारही करणे शक्य होईना. त्यामुळे त्यांच्या बाजूने निवडून आलेले १५ संचालकांनी गट बदलला. ते इंटक काँग्रेस संघटनेत सहभागी झाले. असा त्यांच्या बॅंक कारभाराचा अनुभव आहे.
आता त्यांनी जिल्हा बॅंकेची एसटी कर्मचारी बॅंक करण्याचा विचार आहे काय, हे पाहावे लागेल. जिल्हा बॅंकेच्या विद्यमान संचालकांच्या अडीच वर्षांच्या कालावधीत प्रगतीची आकडेवारी सर्वांसमोर आहे. विश्वासार्हता, पारदर्शी कारभारामुळेच या कालावधीत एक हजार कोटींनी ठेवी वाढल्यात. शंभर रुपयांची ठेव ठेवतानाही एनपीएसह सर्वच बाबतीत प्रगती झालेली आहे.”