भाजपचे सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी देखील मागणार नसल्याचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.
सुधीर गाडगीळ यांनी 2014 आणि 2019 साली अशा दोन वेळा सांगलीतून विधानसभा निवडणूक लढली होती. त्यात ते विजयी देखील झाले होते. यावेळी देखील भाजपकडून त्यांनाच उमेदवार मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती.
परंतु, 2024 ची विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. निवडणुकीतून संन्यास घेतला असला तरी भाजप पक्षाचेच काम करणार असून पक्ष जो उमेदवार येईल त्याचं प्रामाणिकपणे काम करेल असे देखील त्यांनी त्या लेटरमध्ये म्हटलं आहे. दहा वर्षाच्या कार्यकाळात सांगलीमध्ये अनेक विकासकामे केल्याचे देखील त्यांनी पत्रात म्हटले आहे.
सुधीर गाडगीळ यांनी अचानकपणे लेटर बॉम्ब टाकत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने सांगली भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच आता सांगलीतून भाजपचा उमेदवार कोण असणार याची देखील चर्चा सुरू झाली आहे.