महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रविवारी (दि. 17) तपोवन मैदानावर तोफ धडाडणार आहे. सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. प्रचारासाठी केवळ दोनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे तयार केलेले वातावरण मतदानाच्या दिवसापर्यंत टिकविण्याचा प्रयत्न उमेदवारांच्या वतीने सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रीय नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात येत आहेत.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांची रविवारी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी तपोवन मैदानावर सभा होणार आहे. सभेसाठी 40 ते 50 हजार लोक बसू शकतील, असा भव्य मंडप घालण्यात येत आहे. सभेनिमित्त ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात येत आहेत. तपोवन मैदानावर खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव आदींनी भेट देऊन पाहणी केली. सभेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खा. धनंजय महाडिक व जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.