काहीच दिवसांवर प्रजासत्ताक दिन आलेला आहे. प्रत्येकाने आपल्या राष्ट्रध्वजाचा मान हा राखायलाच हवा. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये. जिल्ह्यातील नागरिकांनी प्लास्टिकचा राष्ट्रध्वजासाठी वापर होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.
स्थानिक पातळीवर नागरिकांनी तसेच जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आरोग्य संस्था अशा शासकीय निमशासकीय यंत्रणा तसेच सामाजिक अशासकीय संस्था व स्थानिक पोलीस यंत्रणा यांना प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही व अशा प्रकारांना पायबंद बसेल याची काळजी घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे. तसेच समारंभानंतर रस्त्यावर किंवा इकडे तिकडे पडलेले राष्ट्रध्वज योग्य तो मान राखून ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.