कोल्हापूर शहरात सध्या डेंगूचा फैलाव होत असल्याचे चित्र आहेच. अशातच हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच लक्ष घालून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
रुकडी येथे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत लक्षणिय वाढ झाली असून गावातील मुख्य चौकासह रस्त्यांवर उभी राहून वाहनधारकांचा पाठलाग करत हल्ला करण्याचे प्रकार दिवसेंदिवस खूपच वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
यामुळे अनेक अपघात घडून अनेक जण जखमी देखील होत आहेत. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांकडून पादचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने कडेकोट बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेने चाचपडत मार्ग काढावा लागत आहे.