बेरील चक्रीवादळामुळे सध्या बार्बाडोसमध्ये (Barbados) अडकलेल्या भारतीय क्रिकेट संघाला(Team India) त्यांच्या ऐतिहासिक T20 विश्वचषक 2024 विजयानंतर मायदेशी परतण्यास विलंब होत आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) परिस्थितीबद्दल अद्यवत माहिती प्रदान केली आहे.वादळादरम्यान सर्व बाह्य उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि बेटाचा विमानतळ बंद आहे याची पुष्टी केली आहे.
चक्रीवादळामुळे बार्बाडोसमधील विमानतळ, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि दुकाने बंद करण्यात आली आहेत. भारतीय संघाचे हॉटेल आपत्कालीन परिस्थितीमुळे मर्यादित कर्मचाऱ्यांसह कार्यरत आहे.नुकत्याच दिलेल्या निवेदनात, BCCI ने आश्वासन दिले आहे की ते खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि मीडिया टीमसह टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत आणि चक्रीवादळ ओसरल्यावर त्यांच्या प्रस्थानाची सोय करतील.
हॉटेलमधील मर्यादित कर्मचाऱ्यांमुळे भारतीय संघाला रांगेत उभे राहून कागदी ताटांवर जेवण करावे लागल्याचे वृत्त प्रसिद्ध पत्रकार बोरिया मजुमदार यांनी दिले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने आयोजित केलेल्या चार्टर फ्लाइटने बार्बाडोस सोडण्यात यशस्वी झाला असल्याची माहिती आहे. भारतीय संघ मुळात 1 जुलै रोजी रवाना होणार होता, परंतु बार्बाडोसमध्ये हाय अलर्ट असल्याने विमानतळ सोमवारी (BST) किमान दुपारपर्यंत बंद राहील आणि चक्रीवादळाचा धोका कमी झाल्यावरच ते पुन्हा सुरू होईल.
