आजपासून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत

राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून आता पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली.या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना आता मोफत उपचार मिळणार आहेत.

राज्य शासनाने २०१२ पासून महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू केली आहे. यामध्ये दीड लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळत होते. तर केंद्र सरकारने २०१८ पासून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे. यातून पाच लाखांपर्यंत उपचार मोफत केले जातात.

सन २०१९ मध्ये राज्य शासनाने या दोन्ही योजना एकत्र करून राज्यातील नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार सुरू केले. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून १३५६ विविध प्रकारच्या आधारावर मोफत उपचार केले जातात.महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड काढणे आवश्यक आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आपली शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे.

कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड नंबर शिधापत्रिकेशी संलग्न असण्यासाठी त्याचे ऑनलाईन लिंक करण्याची गरज आहे.शासनाच्या या आरोग्य योजनेतून गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात ४० हजार रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.

यात सर्वाधिक लाभ कर्करुग्ण आणि हृदय रुग्णांना मिळाला. सांगली जिल्ह्यातील ३८ रुग्णालयांमध्ये शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली जाते. या रुग्णालयांना गतवर्षी लाभार्थी रुग्णांवर केलेल्या उपचारापोटी जवळपास ९९ कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे.