खासगी सावकाराकडून ३० टक्के व्याजाने घेतलेल्या १५ हजार रुपयांसह व्याजाच्या पैशासाठी वारंवार लावलेल्या तगादास कंटाळून मानसिक तणावाखाली २५ वर्षीय तरुणाने रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली.ही दुर्दैवी घटना सोमवार, १ जुलै रोजी सकाळी १० वाजता सांगोला -मिरज रेल्वे लाइनवर घडली.
अनिरुद्ध ऊर्फ सोनू शिवाजी डांगे (वय २५, रा. सांगोला) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत मयताचा भाऊ प्रफुल डांगे यांनी फिर्यादी आहे.रोहित देठे (रा. सांगोला) याच्यासह दोन अनोळखी इसमांविरुध्द गुन्हा दाखल केला. अनिरुद्ध डांगे याने मागील चार महिन्यांपूर्वी खासगी सावकाराकडून ३० टक्के व्याजाने घेतलेल्या १५ हजार रुपयांपोटी दर आठवड्याला त्यास ४ हजार रुपये व्याज देत होता.
मागील १५ दिवसांपूर्वी अनिरुद्ध याने भाऊ प्रफुल यास घरी भेटून सावकाराने व्याजाच्या पैशासाठी तगादा लावला आहे. त्याने माझी दुचाकी व मोबाईल बळजबरीने घेऊन गेल्याचे त्याने रडत रडत सांगून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले होते.
दि. ३० जून रोजी रात्री १० वाजता दोन अनोळखी इसमांनी त्याच्या घरी येऊन अनिरुद्ध त्याची पत्नीसमोर मुद्दल व व्याज आत्ताच्या आत्ता द्या म्हणून पैशाची मागणी केली.त्रासाला कंटाळून सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास मिरजकडून येणाऱ्या रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन जगताप करीत आहेत.