29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. 2013 नंतर टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देश आपल्या टीमचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. मात्र टीम इंडिया अजूनही बार्बाडोसमध्ये अडकून पडली आहे. 29 जून रोजी अंतिम सामना खेळला गेला, त्यानंतर तेथे आलेल्या चक्रीवादळाने टीम इंडियाला बार्बाडोसमध्येच राहावे लागले.
वादळामुळे बार्बाडोसचे विमानतळ बंद करण्यात आले असून तेथे कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. टीम इंडिया गेल्या मंगळवारी तिथून रवाना होणार होती, पण त्याला देखील उशीर झाला. त्यामुळे उद्या सकाळी 6 वाजता टीम इंडिया दिल्लीत दाखल होणार आहे. यासाठी एक एअर इंडियाचं विशेष विमान बार्बाडोस विमानतळावर दाखल झाले आहे.
टीम इंडिया मायदेशात दाखल झाल्यानंतर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते सर्व खेळाडूंना गौरवण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. तसेच नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. यानंतर मुंबईत विश्वचषकाच्या ट्रॉफीसह सर्व खेळाडू ओपनडेकबसमधून विजयी मिरवणूक काढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत बीसीसीआयकडून अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही.