देशातील सर्वांत श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी येत्या 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. बुधवारी अंबानी कुटुंबीयांकडून ‘मामेरू’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक लक्ष वेधलं अभिनेत्री जान्हवी कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया यांनी.
अनंत-राधिकाच्या ‘मामेरू’ कार्यक्रमाला जान्हवी आणि शिखर हे पारंपरिक गुजराती पोशाखात दिसले. यावेळी जान्हवीने स्लीव्हलेस ब्लाऊज आणि नारंगी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर शिखरने नीळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला होता. पापाराझींनी या दोघांचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे.मामेरू समारंभ ही लग्नापूर्वीची गुजराती परंपरा आहे. या समारंभात वधूचे मामा तिला मिठाई आणि भेटवस्तू देतात.
या भेटवस्तूंमध्ये सामान्यत: पनेतर साडी, दागिने, आयव्हरी किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या, मिठाई आणि सुका मेवा यांचा समावेश असतो. वधूच्या लग्नापूर्वी कौटुंबिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा समारंभ आयोजित केला जातो. मामेरू समारंभ केवळ विवाहसोहळ्याच्या सांस्कृतिक समृद्धीतच भर घालत नाही तर वधू आणि तिच्या कुटुंबाला भावनिक आधार आणि आनंददेखील प्रदान करतो.