राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील मेट्रोच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. असा आरोप कॅगच्या अहवालातून करण्यात आला आहे. नागपूरच्या सीताबर्डी येथे मेट्रोच्या स्टेशनचे काम नीट केले नसताना पुन्हा त्याच कंपनीला काम का दिले गेले? असा प्रश्न उपस्थित करत नागपूरच्या मेट्रो प्रोजेक्टवरून कॅगने सादर केलेल्या अहवालाचा दाखला देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला.
आज विधानसभेतील पुरवणी मागणी वरील चर्चेदरम्यान त्यांनी हे आरोप केले आहेत. नागपूर येथील सीताबार्डी मेट्रो स्टेशनचे काम अद्याप पूर्ण झाले नसतानाही नव्याने याच कंपनीला कोट्यावधी रुपयांचा ऍडव्हान्स देण्यात आला. 2018 मध्ये करार संपण्याच्या दोन महिने आधी देखील ऍडव्हान्स देण्यात आला. असे कॅगने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडचे काम करण्यास जी कंपनी अयशस्वी असणार आहे, हे माहिती असून देखील करार संपुष्टात येण्यास या कंपनीने एक वर्ष उशीर केला.
या कंपनीवर प्रशासन एवढे उदार का आहे, असा प्रश्नाही जयंत पाटील यांनी उपस्थित केलाय. खरंतर हा उपमुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टवर उपमुख्यमंत्री महोदयांचे टॉप टू बॉटम लक्ष होते. तरीही हा भ्रष्टाचार कसा झाला, याचा मला प्रश्न पडला आहे. या मेट्रोच्या कामात अनेक गैरव्यवहार झाले आहेत. पण मी काही मोजक्याच गोष्टी मांडत आहे. जयंत पाटील यांनी सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचे नाव घेतल्याने आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. त्यावरून जे सभागृहात नाहीत त्यांचे नाव घेऊ नये आणि जे या सभागृहात आहेत त्यांचे नाव घेत असला तर त्यांना नोटीस द्या आणि मग बोला, असे शेलार म्हणालेत. यानंतर भाजप नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.