सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत. रस्ते, पाणी, वाहतूक, पार्किंग याबाबतीत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. इस्लामपूर येथील तिरंगा चौक ते डांगे पेट्रोल पंप रस्त्याखालून जाणारी जुनी पिण्याच्या पाण्याची पाईपलाइन काढून नवीन पाईपलाइन टाकून मिळावी अशी मागणी प्रदिप थोरात युथ फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन इस्लामपूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांना देण्यात आले. इस्लामपूर शहरातील तिरंगा चौक ते डांगे पेट्रोल पंप या रस्त्याचे काम सुरू होणार आहे.
या रोडखालून पिण्याच्या पाण्याची पाईपलाइनमधून कोल्हापूर रोड, शास्त्रीनगर, शिवनगर इंदिरा कॉलनी, विद्याप्रसाद कॉलनी या परीसरात पाणीपुरवठा होतो. या रोडखालून जुन्या सिमेंटच्या मुख्य पाईपलाइन गेल्या आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. त्यामुळे वरचेवर लिकेज होऊन पाण्याची गळती होते. परिसरातील नागरिकांना नाहक त्रास होतो. पाणी वेळेत येत नाही. त्यामुळे नविन रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी सिमेंट पाईपलाइन काढून नविन प्लास्टिक फायबर पाईपलाइन टाकावी. पाईपलाइन झाल्यास लिकेज होऊन पाण्याची गळती होणार नाही. रस्ताही वारंवार खोदला जाणार नाही. रस्ता चांगला टिकेल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी प्रदिप थोरात, जयंत नलवडे, धिरज आवसरे, बाळासाहेब बोराटे, आशुतोष जाधव, निवास सोन्नर, साहिल टिबे, गोरक्षक जाधव, उदय माने यांच्यासह नागरिक उपस्थित होते.