राज्यात तीन दिवस पावसाचे, कुठे-कोणता अलर्ट….

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचे आहे. घाटमथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहे. समुद्र सपाटीपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांना फटका बसला आहे. कोकण रेल्वेवरील अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत.

मुंबईहून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या अडीच ते दिड तास उशिराने धावत आहेत. कोकण कन्या दीड तास उशीराने धावत आहेत. मंगलूर एक्स्प्रेस दोन तास तर तुतारी दोन तास उशिराने धावत आहे. मडगाव एक्स्प्रेस सद्धा दोन तास विलंबाने धावत आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेस अडीच तास उशिराने धावत आहे.

मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. भिवंडीत रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडवला. भिवंडीतील भाजी मार्केट, नझराणा सर्कल, तीन बत्ती, मंडई, शिवाजी चौक या भागात गुडघाभर पाणी साचले आहे. मुंबईतील काही ठिकाणी सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात देखील झाली आहे. भायखळा, लालबाग, परळ, दादर भागात पाऊस मुसळधार सुरू आहे.

पुणे शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. स्वारगेट, कात्रज, पेठांच्या भागात पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यात पावसाचा जोर असाच राहिला तर धरण साठ्यातील पाण्यात वाढ होवू शकते. लोणावळ्यात मागील 24 तासांत 216 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. लोणावळ्यात रेकॉर्डब्रेक पाऊस मागील 24 तासांत झाला आहे. लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना पावसात भिजण्याची चांगलीच संधी मिळाली आहे. पावसामुळे लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आता पर्यटकांची पावले लोणावळ्यात वळू लागली आहेत.

पवना धरण परिसरात पावसाची दमदार हजेरी लावली आहे. एका दिवसात धरणाच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली आहे. पवना धरण परिसरात शनिवारी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे एका दिवसात पाणी पातळीमध्ये 3.94 इतकी वाढ झाली आहे. रविवारी सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा 28.77 टक्के इतका झाला आहे. पवना धरण परिसरात काल दिवसभरात 132 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पावसाळा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 662 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात 28.77 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत 655 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यावेळी धरणातील पाण्याची पातळी 30.75 टक्के इतकी होती.