आयपीएल 2025 दरम्यान मुंबई इंडियन्सला (Mumbai Indian) मोठा धक्का बसला आहे. खरंतर, संघाचा युवा डावखुरा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूर संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो या हंगामातील उर्वरित सामने खेळू शकणार नाही. त्याने मार्चमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. पुथूरने त्याच्या पहिल्याच सामन्यात कहर केला होता.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या पुथूरने 3 मोठे झेल घेतले. त्याच्या गोलंदाजीने एमएस धोनीही खूप प्रभावित झाला. सामना संपल्यानंतर धोनीने पण त्याचे कौतुक केले होते. विघ्नेश पुथूरला बाहेर गेल्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याच्या जागी बदली खेळाडूचे नावही जाहीर केले आहे.
विघ्नेशने आयपीएल 2025 मध्ये 5 सामने खेळले आणि 18.17 च्या सरासरीने 6 विकेट्स घेतल्या. आता त्याच्या जागी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indian) आयपीएल 2025 च्या उर्वरित हंगामासाठी लेग-स्पिनर रघु शर्माला त्यांच्या संघात स्थान दिले आहे.
रघुने पंजाब आणि पुद्दुचेरीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे, ज्यामध्ये त्याने 11 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 19.59 च्या सरासरीने एकूण 57 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी 56 धावांमध्ये 7 विकेट्स आहे. तर रघु शर्माने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 9 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत.
रघुने आतापर्यंत तीन टी-20 सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये तीन विकेट घेण्यात यश मिळवले आहे. मुंबई इंडियन्स संघाने रघु शर्माला त्याच्या 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर संघात स्थान दिले आहे.
