सरकारद्वारे अनेक वेगवेगळ्या योजना गावोगावी राबविल्या जातात. या सरकारी योजनांचा नागरिकांना लाभ देखील होत आहे. अशातच हातकणंगले तालुक्यातील रुकडी या गावात गेल्या 18 वर्षांपासून एसटी सेवा बंद आहे.
यामुळे नागरिकांचे सामान्य जनतेचे विद्यार्थ्यांचे खूपच हाल होत असल्याचे चित्र दिसत आहे. इचलकरंजी व कोल्हापूर या प्रमुख शहरांच्या मध्यभागी असणाऱ्या रुकडीतील नागरिक १८ वर्षे महाराष्ट्र परिवहन महामंडळाची एसटी बस सेवेपासून वंचित आहेत. रुकडी परिसरातील हालोंडी, अतिग्रे, हेरले, माले मुडशिंगी, चोकाक, माणगावमधून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी इचलकरंजीला येतात तसेच व्यापारी, महिला, ज्येष्ठ मंडळीची ही कामानिमित्त ये-जा असते.
तरीही गाव एसटी बस सेवेपासून वंचित आहे. विद्यार्थी प्रवाशांनी अनेकवेळा आंदोलन व निवेदन सादर केले. पण त्यावर एसटी प्रशासनाने ठोस निर्णय घेतला नाही. उपसरपंच शितल खोत व शमुवेल लोखंडे यांनी कोल्हापूर- रुकडी-इचलकरंजी एस.टी बस प्रवास सेवा सुरू करण्याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कैफीयत मांडली.
खासदार धैर्यशील माने यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना हा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच एसटी महामंडळ बससेवा पूर्ववत सुरू होण्याची आशा आहे.