रेंदाळ येथील विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेनिम्मित कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खचाखच भरलेल्या कुस्ती मैदानात पै.अमृता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंकोबा मैदान इचलकरंजी येथे सराव करणारा पै. प्रशांत जगताप याने शिव शंभो कुस्ती संकुल तिटवे याला मच्चीकुच्ची डावावर अस्मान दाखविले. जवळपास शेकडो काटा कुस्त्यांनी कुस्ती शौकीनांचे पारणे फेडले. अनेक छोट्या मोठ्या पैलवानांची चिवट झुंज व रंगतदार लढतींनी प्रेक्षकांची वाहवा मिळविली. जवळपास शंभरहून अधिक कुस्त्या संपन्न झाल्या. आयोजकांनी काटेकोर नियोजन केले होते. यामध्ये कमिटी अध्यक्ष राजू कोल्हापूरे, रघुनाथ पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह विशेष परिश्रम घेतले.
द्वितीय क्रमांकाच्या कुस्ती स्पर्धेत हनुमान कुस्ती संकुल राशिवडेचा पै. श्रेयस गाठ याने नॅशनल अकॅडमी नांदगाव पै. विवेक चौगुले याच्यावर एकरी कस करत घुटना डावावर चितपट करीत विजय संपादन केला तर नंबर तीनच्या कुस्ती स्पर्धेत प्रतिस्पर्धी पै.गणेश चौगुले याचेवर पै. स्वप्निल शेंडे याने मात केली. पै. प्रथमेश आबदार, पै. अमित कांबळे, पै. युवराज ठोके, पै. ओंकार पोवार, पै. करण पुजारी, पै. विक्रांत माळी यांनी रोमहर्षक लढतीत प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला. पै. हर्षद दानोळे, पै. प्रसाद सासणे यांच्यात काटा जोड लढतीने कुस्ती शौकीनांचे पारणे फेडले मात्र ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
पै. बाबूराव दांडगे, बाळू कोरे, नेताजी निकम, दत्ता कोरे, कृष्णात माळी, विकास पुजारी व बबनराव दानोळे या पैलवानांनी पंच म्हणून काम केले. अनुभवी सुकूमार माळी यांनी उत्तम समालोचन करीत कुस्ती शौकीनांची रंगत वाढवली. यामध्ये राज नाईक यांनी मोलाची भर टाकली. मैदानाला पीआय निंगाप्पा चौखंडे, सुभाष पुजारी, पीएसआय प्रसाद कोळपे, पीएसआय अशोक चव्हाण, गोपनीय विभागाचे एकनाथ भांगरे, डॉ. सचिन मेथे, ग्रा.स. अविनाश घोडेस्वार, मा. पंचायत समिती सदस्य शिवाजी पुजारी, बाळासाहेब चोपडे, धनंजय कोळी, कृष्णात माळी, संतोष माळी, सतिश घराळ, देवाप्पाना मुधाळे, यात्रा कमिटीचे सदस्य यांच्यासह विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती.
